दौंड: पाटस मार्गावरील मांढरे (Daund News) मळा परिसरातील हॉटेल जगदंबामध्ये 7 जानेवारी रोजी घडलेला (Hotel Jagdamba Daund) एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला होता. या स्फोटात भाजलेल्या दहा (Pune Crime) कर्मचाऱ्यांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून उर्वरितांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे हॉटेलमधील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Latest Marathi News)

दौंड शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल जगदंबामध्ये दुपारच्या सुमारास भटारखान्यात घरगुती वापराचा एलपीजी सिलिंडर फुटला. स्वयंपाक सुरू असतानाच अचानक मोठा आवाज झाला आणि आगीचा लोळ उठला. काही क्षणांतच संपूर्ण भटारखान्यात आग पसरली. तेथे काम करणारे दहा कर्मचारी आगीच्या झळा बसून भाजले. स्फोट इतका तीव्र होता की हॉटेलच्या छपरावरील पत्रे उडाली आणि दर्शनी भागातील काचा तावदानासह खाली कोसळल्या.
जखमी कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने दौंडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर अवस्थेतील सहा जणांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 90 टक्क्यांहून अधिक भाजल्याने त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. काही दिवसांनी नातेवाइकांच्या विनंतीवरून सहा जखमींना आग्रा येथे हलवण्यात आले होते, मात्र त्यातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तपासात असे समोर आले आहे की हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर सिलिंडरचा साठा होता. अग्निशामक विभागाने घटनास्थळी 21 सिलिंडर बाहेर काढले, त्यात 14 घरगुती आणि 7 व्यावसायिक वापराचे सिलिंडर होते. इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस साठा असताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
या दुर्घटनेने हॉटेल आणि ढाब्यांमधील गॅस सिलिंडरच्या वापराबाबत नियमांचे पालन होते की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने अशा आस्थापनांची तपासणी करून सुरक्षिततेचे नियम सक्तीने लागू करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कारण एका निष्काळजीपणामुळे पाच कुटुंबांचा आधार हिरावून गेला आहे.







