पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीचा (Pune Election Result) निकाल हा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल न राहता राज्याच्या राजकारणात मोठे संकेत (Pune Mahapalika Election) देणारा ठरला आहे. राज्यातील 29 महापालिकांपैकी तब्बल 21 महापालिकांवर भाजपने आघाडी (Ajit Pawar) घेत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. काँग्रेस राज्यातील (Murlidhar Mohol) दुसरा मोठा पक्ष ठरला असला, तरी अजित पवार गटाला एकाही महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा निकाल अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Marathi News)

महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यापासून अजित पवार पुणे जिल्ह्यात ठाण मांडून बसले होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी त्यांनी सगळी ताकद पणाला लावली होती. यासाठी त्यांनी शरद पवार गटासोबतही युती केली होती. मात्र प्रत्यक्ष निकालात पुणेकरांनी वेगळाच कौल दिला.
पुणे महापालिकेच्या 165 पैकी 155 जागांचा निकाल लागला असून त्यामध्ये भाजपला थेट 118 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं, तर शरद पवार गटाला फक्त 2 जागा मिळाल्या. काँग्रेसला 16 जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता स्थापनेसाठी त्यांचा काहीही उपयोग होणार नाही. शिंदे गट आणि ठाकरे गट प्रत्येकी एका जागेवर अडकले आहेत.
दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजपने वर्चस्व सिद्ध केलं आहे. 128 पैकी 84 जागा भाजपने जिंकल्या असून राष्ट्रवादीला 37 जागा मिळाल्या आहेत. शिंदे गटाला 6 जागा, तर इतर पक्ष जवळपास नामशेष झाले आहेत. दोन्ही महापालिकांमध्ये भाजपचे दोन प्रमुख चेहरे महेश लांडगे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ अजित पवारांसाठी मोठे अडथळे ठरले.
प्रचारादरम्यान अजित पवारांनी महेश लांडगेंना खुले आव्हान दिलं होतं. “नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकला नाही तर पवारांची औलाद नाही,” अशा शब्दांत त्यांनी लांडगेंवर हल्ला चढवला होता. लांडगेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत “मी ठरवलं तर एखाद्याचा कार्यक्रम करतो” असाही इशारा दिला होता. त्यावर महेश लांडगेंनीही तितक्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर देत अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं होतं.
मुरलीधर मोहोळ यांच्या बाबतीतही चित्र वेगळं नव्हतं. मागील निवडणुकीत मोहोळांना हरवण्यासाठी अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांशी हातमिळवणी केल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. मात्र यावेळी मोहोळांनी भाजपसाठी पुणे जिंकून दिलं.
या निवडणुकीत काही प्रभाग विशेष चर्चेत राहिले. प्रभाग क्रमांक 23 (क) मध्ये राष्ट्रवादीच्या लक्ष्मी आंदेकर यांनी भाजपच्या ऋतूजा गडाळे यांचा केवळ 81 मतांनी पराभव केला. तर नाना पेठ आणि रविवार पेठ असलेल्या प्रभाग 23 (ब) मध्ये राष्ट्रवादीच्या सोनाली आंदेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केला.
वडगाव शेरीतील प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्येही राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे असतानाही त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या पठारे भाजपच्या तिकिटावर निवडून आले. त्यामुळे “शरद पवारांच्या आमदारांच्या घरातच कमळ फुललं” अशी चर्चा शहरभर रंगली.
एकूणच पुणे महापालिकेचा निकाल हा भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा, आक्रमक प्रचाराचा आणि स्थानिक नेतृत्वावर पुणेकरांनी दाखवलेल्या विश्वासाचा विजय ठरला आहे. दुसरीकडे अजित पवारांचा पुण्यातील दबदबा कमी झाल्याचं हे स्पष्ट संकेत देणारा निकाल ठरला असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.







