पुणे: पुणे ग्रॅड चॅलेंज टूर 2026 अंतर्गत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या सायकल (Pune Traffic Diversion) स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. सासवड, जेजुरी, वडगाव निंबाळकर, सुपा आणि बारामती या तालुक्यांतून जाणाऱ्या तब्बल 137 किलोमीटरच्या मार्गावर ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा होणार असल्याने प्रशासनाने सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

ही स्पर्धा केवळ क्रीडाक्षेत्रासाठी महत्त्वाची नसून पुणे जिल्ह्याच्या पर्यटन आणि जागतिक ओळखीच्या दृष्टीनेही मोठी संधी मानली जात आहे. मात्र, हजारो नागरिकांचा दैनंदिन प्रवास प्रभावित होऊ नये आणि खेळाडूंच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने वाहतुकीचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे केले आहे.
सासवड, जेजुरी, सुपा आणि बारामती परिसरातील अनेक महामार्ग, घाटमार्ग आणि शहरातील प्रमुख चौकांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. हडपसर-सासवड-जेजुरी रोड, सासवड-कापूरहोळ मार्ग, सासवड-वीर मार्ग, जेजुरी-सातारा मार्ग, बारामती-निरा-सातारा मार्ग, शिरूर-सातारा हायवे, इंदापूर-बारामती रोड, भिगवण-बारामती रोड आणि पालखी महामार्गावरील अनेक चौकांवर वाहतूक बंद राहणार आहे.
विशेषतः जड-अवजड वाहनांसाठी 21 जानेवारी रात्री 10 वाजल्यापासून 22 जानेवारी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. बारामती एमआयडीसी, पालखी महामार्ग, काटेवाडी पूल, जळोची पूल, रुई ब्रिज, वंजारवाडी ब्रिज अशा ठिकाणी संपूर्ण वाहतूक रोखण्यात येणार आहे.
या स्पर्धेमुळे हजारो सायकलपटू आणि क्रीडाप्रेमी पुणे जिल्ह्यात दाखल होणार असून त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. मात्र, नागरिकांनी प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे ग्रॅड चॅलेंज टूर ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असली तरी सुरळीत आयोजनासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.







