राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, शेतकरी मेळावा व सुभाष आण्णा कुल कृषीभूषण पुरस्कार वितरण सोहळा आज आमदार राहुल कुल यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीकृष्ण मंगल कार्यालय, चौफुला येथे पार पडला. यावेळी कृषी क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या बोरीभडक येथील डाळिंब उत्पादक तुषार सुखदेव मेत्रे यांच्यासह अनेक कृषी बांधवांना कृषिभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दौंड बाजार समितीने कायद्याच्या चौकटीमध्ये व्यापार वाढवेल, पुणे जिल्ह्यात अव्वल होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून गरज पडल्यास केंद्रातून व राज्यातून निधी आणला जाईल, राजकारण विरहित कामकाज करून संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी संचालक मंडळाने हातभार लावणे गरजेचे आहे. स्वच्छता, भौतिक सुविधा निर्माण करून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना फायदा होईल असे कामकाज यापुढील काळात दौंडची बाजार समिती करेल, असा विश्वास आमदार राहुल कुल यावेळी व्यक्त केला.
यवत व पाटस या ठिकाणी उप बाजार सुरू करण्यासाठी जागा मिळण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातुन प्रयत्न सुरू असून, दौंड बाजार समिती शेतकरी, सभासद व व्यापाऱ्यांची हित जपणारी असेल, अशी ग्वाही यावेळी उपस्थित सर्व संचालक, सभासद, शेतकरी व कर्मचारी यांना दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, भाजपचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, भाजपाच्या कांचन कुल यांच्यासह सर्व संचालक, सभासद, पुरस्कार प्राप्त शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.