लोणी काळभोर, ता. 2 : सोलापूर-पुणे महामार्गावरुन सायकलवरून जात असलेल्या सुरक्षा रक्षकाला अज्ञात चारचाकी वाहनाने भरधाव वेगात धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) हद्दीत ग्लोरी हॉटेलसमोर 28 ऑगस्ट रोजी सकाळी घडली. अपघातानंतर जखमीला मदत न करता चालक वाहनासह पसार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , बापू आण्णा खंडागळे (वय 44, रा. माळीमळा, लोणी काळभोर) हे कुंजीरवाडी येथील सिमेंट गोदामात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे सायकलवरून कामावर जात असताना सकाळी साडेआठच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या उजव्या बाजूच्या बरगड्या व खांद्याला फ्रॅक्चर झाले.

अपघातानंतर त्यांना उपचारासाठी यती हॉस्पिटल, त्यानंतर विश्वराज हॉस्पिटल आणि पुढे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी चौकशी केली असता कुटुंबीयांकडे अपघाताची पूर्ण माहिती नसल्याने त्यांनी माहिती घेतल्यानंतर तक्रार देण्याचे सांगितले. त्यानुसार मुलगा कुणाल खंडागळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास केला जात आहे.








