युनूस तांबोळी
शिरूर : शिरूर तालुक्यात रब्बी हंगामातील कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. लावगड होऊन देखील अनेकांची रोपे शिल्लक राहिल्याने कुणी कांद्याची रोपे घेता का, अशी जाहिरात देखील सोशल मीडियावर दिसत असल्याचे चित्र आहे. परंतु सध्या विजेच्या समस्यांनी शेतकरी हैराण झाला असल्याचे दिसून येत आहे.
कांदा पिक हे शेतकऱ्यांना दिलासा देणारे पिक ठरते. कमी वेळेत आणि कमी खर्चात, उसाची तोडणी झाल्यानंतर रिकाम्या क्षेत्रात हे पीक घेतात. या भागात पीक देखील चांगले येत असल्याने अनेकनाई कांदा चाळ बांधून घेतली आहे. त्यामुळे आता उत्पादन काढून प्रतवारी ठरवल्यास यातून चांगला नफा देखील मिळतो. ऊस तोडणीनंतर कांद्याचे पीक सर्वच शेतकरी घेताना दिसतात.
कांद्याच्या पिकाने यापूर्वी अनेकदा चांगला नफा मिळवून दिला आहे. मात्र लहान शेतकऱ्यांना मात्र यातून पाहिजे तेवढा नफा मिळत नाही. कमी बाजारभाव मिळाल्याने अनेकदा भांडवल देखील वसून न होण्याचे प्रमाण अधिक आहे. यासाठी काही शेतकऱ्यांनी कांदा चाळ ही कर्जे काढून बांधून घेतली मात्र, बाजारभाव कोसळल्याने कर्जाच्या रकमेत वाढ होत आहे.
गेल्यावर्षी पावसाचा कांदा पिकावर परिणाम झाला होता. त्यामुळे नफा झाला नाही. यावर्षी मात्र शेतकऱ्यांनी कांद्याची रोपे घरीच टाकली होती. त्यातून मोठ्या प्रामणात कांद्याची रोपे तयार झाली आहेत. त्यामुळे लागवड करून देखील मोठ्या प्रमाणात रोपे शिल्लक राहिली आहेत. त्यामुळे अनेक जणांनी सोशल मीडियावर कांद्याची रोपे विकायला काढली आहेत तर काहींनी जनावरे सोडून चारा मोकळा केला आहे.
गेल्या वर्षाच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली आहे. त्यातून कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. यासाठी लागणारा मजूर वर्गाची टंचाई दिसून येत आहे. तरी देखील सावडीने व मजूरीने कांद्याची लागवड सुरू आहे. या वर्षी मोठ्या प्रणाणात कांदा पिकाचे उत्पादन होणार असल्याचे शेतकरी बोलू लागला आहे.
कांदा पिकासाठी विजेची अडचण
कांदा पिकासाठी पाण्याची उपलब्धता होत असली तरी देखील विजेच्या लंपडावाने लागवड रखडण्याची शक्यता आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम या लागवडीवर होणार आहे. त्यासाठी काही शेतकऱ्यांनी विजेच्या इंजीनची उपलब्धता करत लागवडीचे काम सुरू ठेवले आहे. विजेच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
कांदा पिक क्षेत्र : शिरूर तालुका
मागील वर्षी : ३१.१२.२०२१ अखेर १५५६२ हेक्टर क्षेत्र
चालू वर्षी : ३१.१२.२०२२ (आज) अखेर १४४७५ हेक्टर क्षेत्र
ए. बी. जोरी कृषी सहाय्यक म्हणाले की , योग्य हवामान व कांदा रोपे यांची उपलब्धता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी कांद्याची योग्य लागवड करावी. त्याबरोबर खताची मात्रा व औषधे कृषी विभागाच्या सल्लाने त्याचा वापर करावा. त्यातून कांदा पिकाचे दमदार उत्पादन होण्यास मदत होणार आहे.