दौंड : दौंड विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून वीरधवल जगदाळे यांनाच उमेदवारी मिळावी आणि भाजपातर्फे आमदार राहुल कुल यांनी दाखल केलेली उमेदवारी मागे घेऊन राहुल कुलांनी आत्ता थांबण्याची गरज आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी व्यक्त केले आहे.
वैशाली नागवडे पुढे म्हणाल्या की, दौंड विधानसभेची जागा ही आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे. त्यामुळे या जागेवर आमचाच हक्क असून दौंडच्या विकासासाठी वीरधवल जगदाळे हेच एकमेव पर्याय आहेत. राज्यात महायुती झाली असली तरी दौंड तालुक्यात अजित पवार यांना मांनणारा मोठा गट असून मागील वेळी जेमतेम मतांच्या फरकाने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून गेली होती, परंतु यावेळी मात्र दौंड तालुक्यात घड्याळाचे काटे चालणार असून दौंड तालुक्याच्या विकासाची वेळ साधण्यासाठी राहुल कुल यांनी निवडणुकीतून माघार घेत आता थांबणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही महायुतीच्या वरिष्ठांना तशी विनंती देखील केली आहे. दौंड तालुक्यात गटातट्याच्या राजकारणापेक्षा अजित पवारांचा शब्द अंतिम असतो, त्यामुळे वीरधवल जगदाळे हे एक पर्याय म्हणून पुढे येत आहेत. ते दौंड तालुक्यात इतर उमेदवारापेक्षा लोकप्रिय आहेत.
दौंड विधानसभेसाठी भाजपातर्फे राहुल कुल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून वीरधवल जगदाळे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी जर जगदाळे आणि कुल असे दोन्हीही अर्ज राहिले तर राज्यात असणारी महायुती दौंड मध्ये तुटणार की काय? हे घड्याळाची वेळ सांगेल अशी चर्चा आता रंगू लागली आहे.