राहुलकुमार अवचट
यवत : ‘जलजीवन मिशन’चे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून महिला वनरक्षकाला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना वरवंड गावच्या हद्दीत घडली. याप्रकरणी तिघांविरोधात यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि.२९) दुपारी तीनच्या सुमारास वरवंड गावाचे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची पाईपलाईनचे काम जेसीबी मशीनच्या साह्याने खोदकाम चालू असून, ठेकेदार अमोल पोपट भोईटे हा कोणताही परवाना नसताना वाखरी गावच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची पाईपलाईन करत असल्याचे निदर्शनास आले. यावरून महिला वनरक्षक शितल मरगळ यांनी जेसीबी मशिन व ठेकेदार यांच्याविरूद्ध वन विभाग कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला.
तसेच जेसीबी मशिन जप्त करून चालकास दौंड येथील वन विभाग कार्यालय येथे घेऊन जाण्यास सांगितले. तेव्हा ठेकेदार भोईटे याने ‘तुम्ही मला पैसे मागितले अशी तुमची खोटी तक्रार करतो व तुम्ही एकटे फिरता तुम्हाला काहीही करू शकतो’, असा दम दिला तर ठेकेदार अमोल भोईटे याने धक्काबुक्की व शिविगाळ करुन जेसीबी मशिन घेऊन गेल्याची फिर्याद शितल गंगाराम मरगळ यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली.
या फिर्यादीवरून ठेकेदार अमोल पोपटराव भोईटे, ढमाले व ठेकेदार याचा भाचा (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. सी. बंडगर हे करत आहेत.