भोर / जीवन सोनवणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सातत्य ठेवले पाहिजे. पूर्णपणे झोकून देऊन केलेले कार्य नक्कीच यश मिळवून देते, असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल यांनी सांगितले.
नवसह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी राहुल महिवाल बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, समूह संचालक सागर सुके, उद्योजक प्रमोद घुले, विश्वस्त बाबुराव सुके, आर्किटेक्ट मीनल खबाले, प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
राहुल महिवाल पुढे म्हणाले, आपल्याकडे असलेली ऊर्जा एकाच ठिकाणी केंद्रित करावी, मनाने तंदुरुस्त असणे देखील गरजेचे आहे. स्वाध्याय हाच अभ्यासातील महत्वाचा घटक आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अनेक अधिकारी हे अभियंते आहेत. त्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी याकडे एक उत्तम संधी म्हणून पाहिले पाहिजे.
पोपटराव सुके म्हणाले, स्पर्धा परीक्षा केंद्रातून अनेक अधिकारी घडवण्याचे ध्येय असून, ग्रामीण भागातील विद्यार्थी हा अधिकारी म्हणून देशाच्या कानकोपऱ्यात पोहचला पाहिजे हा संस्थेचा उद्देश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. सायली जाधव यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. मुळे यांनी केले.