पुणे : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्त्येक पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. अशातच इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील अशा चर्चांनी जोर धरला आहे. अशातच आज दुपारपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे, त्यावर आज सांगलीमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. सांगली दौऱ्यावर असताना शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांचे दुपार पर्यंत काय होतंय बघूया. दुपारी माझ्याकडे प्रतिक्रिया घ्यायला या, असे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.
एका रात्रीत भाजपा कार्यालयाचे फलक हटवले..
इंदापूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी फुंकण्याचे संकेत दिले आहेत. इंदापूरातील भाजपा कार्यालयाचे फलक हटवण्यात आले आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या भेटीनंतर इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इंदापूर शहरात असणाऱ्या भाजप कार्यालयावरील फ्लेक्स एका रात्रीत हटवण्यात आले आहेत.
हर्षवर्धन पाटील यांचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटात जाण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. इंदापूर शहरातील त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयावरील संपूर्ण फलक हटवण्यात आले असून त्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो व कमळ चिन्ह देखील काढण्यात आले आहे.