पुणे : सीएनजी पुरवठाधारकांना शासनाने मंजूर केलेले वाढीव सेवामूल्य (कमिशन) मिळावे, या मागणीसाठी पंप चालकांनी शुक्रवारपासून (ता.२६) बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. तसेच याबाबत पंप चालकांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र दिले आहे.
ग्रामीण भागात गुजरातमधील टोरेंट गॅस कंपनी सीएनजीचा पुरवठा करते. मात्र, विक्रेत्यांना शासनाने मंजूर केलेले वाढीव सेवामूल्य देण्यास ही कंपनी टाळाटाळ करत आहे. केंद्र शासनाने सीएनजी वितरकांसाठी वाढीव सेवामूल्य जाहीर केले आहे. पुणे शहराला सीएनजी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने वाढीव सेवामूल्य विक्रेत्यांना दिले.
दरम्यान, ग्रामीण भागात पुरवठा करणाऱ्या टोरेंट कंपनी व्यवस्थापन देण्यास टाळाटाळ करत असून याबाबत यापूर्वीही विक्रेत्यांनी संप पुकारला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी विक्रेते आणि कंपनी व्यवस्थापनाची बैठक घेतली होती. त्यात कंपनीने सेवामूल्य देण्यासाठी वेळ मागून घेतला होता.
त्यानंतरही वाढीव सेवामूल्य दिले जात नाही, कधीपर्यंत देणार हे सांगितले जात नाही, त्यामुळे विक्रेत्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सीएनजी पंप चालक संघटनेचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिली आहे.