पुणे: आंबेगाव बुद्रुक परिसरात शाळकरी मुलावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून दोन अल्पवयीन मुलांनी आपल्या 15 वर्षीय वर्गमित्राला रस्त्यात अडवून त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. शाळेच्या जवळच भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थी आणि आरोपी दोघेही एकाच शाळेत शिक्षण घेतात. काही दिवसांपूर्वी तिघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर हा वाद मिटला असला तरी आरोपींच्या मनात त्याचा राग कायम असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनेच्या दिवशी 15 वर्षीय मुलगा आपल्या वाहनावरून जात असताना आरोपींनी त्याला शाळेजवळ अडवले. त्यानंतर दोघांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मुलाच्या डोक्याला, पाठीला आणि हाताला दुखापत झाली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला.

घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी जखमी विद्यार्थ्याला मदत केली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. हल्ल्यामागचे नेमके कारण, घटनेपूर्वीचा वाद आणि वापरण्यात आलेल्या शस्त्राबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







