पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांना झालेल्या गंभीर मारहाणीप्रकरणी आणि 5 लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या हायप्रोफाईल गुन्ह्याची मुख्य सूत्रधार मानली जाणारी ‘बिग बॉस’फेम दिव्या सुनील शिंदे हिच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमित कुलकर्णी यांनी दिव्या शिंदेची पोलीस कोठडी 2 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

तपास पथकाने दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 17 जणांच्या टोळीचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. तसेच हल्ला करण्यासाठी आरोपींनी 8 दुचाकींचा वापर केला होता. पोलीस चौकशीदरम्यान दिव्या शिंदे सहकार्य करत नसून, ‘अँग्झायटी अटॅक’चा बहाणा करून आणि आरडाओरड करून माहिती लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पोलिसांनी न्यायालयात केला आहे.

या प्रकरणात पोलीस पथकाने पुणे कॅम्प परिसरातील एका हॉटेलचे CCTV फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजमध्ये मुख्य आरोपी अप्पा ढमढेरे, डॉ. गायकवाड आणि त्यांचा मुलगा यांच्यात खंडणीबाबत बैठक सुरू असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कटात अप्पा ढमढेरे, निखिल शिंदे, निखिलची होणारी पत्नी, ताहीर आणि इतर 13 जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.

न्यायालयात बाजू मांडताना सरकारी वकील ॲड. आम्रपाली कस्तुरे यांनी सांगितले की, हल्ल्यासाठी वापरलेली लोखंडी हत्यारे, लाकडी दांडके, मोबाईल फोन आणि आरोपींच्या स्वाक्षऱ्यांचे नमुने हस्तगत करणे अजून बाकी आहे. मूळ तक्रारदारांच्या बाजूने ॲड. शिवम निंबाळकर यांनी काम पाहिले.या प्रकरणात आता दिव्या शिंदे हिच्या अडचणी वाढल्या आहेत







