बापू मुळीक
पुरंदर : सासवड( ता. पुरंदर) येथील साईनाथ आईस फॅक्टरीला वीज चोरी प्रकरणात दिवाणी न्यायालयाने दुसऱ्यांदा दणका दिला आहे. वीज चोरी पोटी आकारलेले देयक चुकीचे असल्याचा दावा, फेटाळल्याने साईनाथ आईस फॅक्टरीला 35 लाख 86 हजाराचा दंड भरल्याशिवाय वीज पुरवठा पूर्ववत करता येणार नसल्याचे न्यायालयाने बजावल्याने वीज चोराचे धाबे दणाणले आहे.
महावितरणच्या भरारी पथकाने सासवड येथील साईनाथ आईस फॅक्टरीची वीज चोरी अनुक्रमे 6 एप्रिल 2022 व 15 मार्च 2023 अशी दोन वेळा उघडकीस आणली होती. पहिल्या वेळी आईस फॅक्टरीला दोन लाख 34 हजार 243 युनिटची चोरी केल्याबद्दल 35 लाख 86 हजाराचा दंड आकारला होता. आकारलेल्या दंडाबाबत व वीज पुरवठा जोडून देण्याबाबत साईनाथ फॅक्टरीचे मालक नारायण दगडू पवार यांनी दिवाणी न्यायालयात अर्ज केला होता. दिवाणी न्यायालयाने बिल कायम ठेवले. त्यानंतर पवार यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली. यामध्ये आरोपीला काही काळ अटक सुद्धा झाली होती.
दरम्यान पहिले प्रकरण दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्या कोर्टात दावा चालू असताना, साईनाथ आईस फॅक्टरीने दुसऱ्यांदा मीटर बायपास करून वीज चोरी केली. महावितरणच्या भरारी पथकाने दिनांक 15 मार्च 2023 रोजी ही वीज चोरी उघडकीस आणली. तेव्हा या ग्राहकाला पुन्हा 22 लाख 32 हजाराचा दंड आकारण्यात आला. ही रक्कम ग्राहकाने भरली मात्र पहिल्या चोरीतील दंडाची रक्कम पूर्ण भरलेली नसल्याने जोपर्यंत 35 लाख 86 हजाराचा दंड भरला जात नाही. तोपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करता येणार नसल्याचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून ग्राहकाचा अर्ज फेटाळून लावला. यावर आईस फॅक्टरीने वीज चोरीचे देयक चुकीचे असल्याचा दावा केला.