संदीप टूले
केडगाव : येथील हंडाळवाडी-म्हसोबा चौकातील चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची गती वाढली आहे. परिणामी रस्त्यालगतच्या दुकानदारांसह पादचाऱ्यांनी अपघाताची भिती व्यक्त केली. येथे गतिरोधक बसवावेत, अशी मागणी व्यावसायिकांनी व नागरिकांनी केली आहे.
हांडाळवाडी (केडगाव, ता. दौंड) येथील म्हसोबा चौक व परिसर हा नेहमीच वर्दळीचा असतो. या चौकात खुटबाव, दापोडी, केडगाव व हांडाळवाडी या चारही गावाकडून येणारे रस्ते जोडले जातात. त्यामुळे या चौकात नेहमीच वर्दळ असते.
त्यात आता चारही बाजून येणाऱ्या रस्त्यांची कामे झाली आहेत तर काही अंतिम टप्प्यात आहेत. रस्ते चांगले झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. काही क्षणातच हा चौक वाहनचालक पार करताना दिसतात. डांबरीकरण करुन चार दिवस झाले, यादरम्यान काही दुचाकीस्वारांचे किरकोळ स्वरुपाचे अपघात झाले आहेत.
याच चौकात एका बाजूला म्हसोबा देवाचे मंदिर तर दुसऱ्या बाजूला इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आहेत. या चारही बाजूंनी रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना व दवाखान्यात उपचारासाठी जाणार्या वृद्धांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. इतर वळण घेणार्या वाहनचालकांना तर सावधगिरी बाळगावी लागते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानेही नागरिकांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर गतिरोधक बसवणे गरजेचे आहे.
हंडाळवाडी-म्हसोबा चौकात आबालवृद्धांची रस्ता ओलांडताना तारांबळ उडते. दुसरा कोणताही अनुचित प्रकार घडण्याची वाट न पाहता, या चौकात महत्त्वाच्या ठिकाणी प्रशासनाने गतिरोधक बसविणे गरजेचे आहे.
– दिलीप हंडाळ, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती