संदीप टूले
लोणी काळभोर : बुद्धिमत्ता विचारशक्ती भावना या मनुष्यप्राण्याला मिळालेल्या देणग्या आहेत. याचा वापर योग्य वेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित आहे. नाहीतर प्राणीमात्र आणि मनुष्य यांच्यात फरक उरणार नाही. निदान त्याच्यातील कृतज्ञतेची भावना मारली गेली नसेल तर इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना वाढीस लागते याचाच प्रत्यय म्हणजे चित्रसेन पांडुरंग जवळकर.
आळंदी म्हातोबाची येथील शेतातील मोटर बंद करण्यासाठी गेलेले चित्रसेन पांडुरंग जवळकर (वय ३५, रा. आळंदी म्हातोबाची) या तरुण शेतकऱ्याला सर्प दंश झाल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, जवळकर यांना आळंदी म्हातोबाची गावकऱ्यांनी गावाचा उरूस रद्द करत आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
चित्रसेन हे अत्यंत शांत, संयमी, हसतमुख असलेल्या व्यक्तिमत्त्व पण त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबासह गावावर मोठा आघात झाला. अनेकांनी हळहळ व्यक्त केली, तसेच चित्रसेन जवळकर हे आळंदी म्हातोबाची येथील श्री म्हातोबा जोगेश्वरी नवरात्र उत्सव कमिटीचे अध्यक्ष होते. तसेच प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. हा तरुण हरहुन्नरी कार्यकर्ता अचानक निघून गेल्याने सर्व गावकऱ्यांनी मिळून एक निर्णय घेतला.
आळंदी म्हातोबाची गावचा उरूस हा येत्या ४ आणि ५ जानेवारी २०२४ रोजी असून संपूर्ण गावाने हा उरूस साजरा न करण्याचा एकमताने निर्णय घेत जवळकर यांना खऱ्या आर्थाने सार्वजनिक श्रद्धांजली अर्पित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आगामी काळात उर्साच्या महिन्यात अशीच काही घटना घडली. तरी गावाने उरूस रद्द करण्याचे ठरविले आहे. या गावच्या निर्णयाने आसपासच्या परिसरातील ही गावांना एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. गावंखेड्यामध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे याचे हे मूर्तिमंत उदाहरण दिले आहे.