कुरकुंभ, ता. 21 : मोटारसायकलचा लहान मुलाला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे मारहाण, शिवीगाळ आणि धमकीच्या प्रकारात रूपांतर झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कुरकुंभ (ता. दौंड) येथे 17 सप्टेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सिराज सिंकदर शेख, सिंकदर शेख (पूर्ण नाव माहिती नाही) आणि झोया सिराज शेख, सर्व रा. कुरकुंभ, ता. दौंड, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिपाली अमर जोगी (वय 25, रा. कुरकुंभ, मूळ रा. भागदरा, ता. जामनेर, जि. जळगाव) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली यांचा भाऊ कृष्णा सोनवणे हा मोटारसायकलवरून एका व्यक्तीला घेऊन मोरया हॉस्पिटलसमोर आला. कृष्णाच्या मोटारसायकलीचा धक्का लागल्याने एका मुलाला किरकोळ दुखापत झाली. या कारणावरून संबंधित व्यक्तीने कृष्णाला मारहाण केली. यावेळी दिपाली आणि त्यांच्या नणंदेने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित व्यक्तीने त्यांना शिवीगाळ केली आहे.

त्यानंतर दिपाली यांनी पुढील वाद टाळण्यासाठी भाऊ कृष्णाला गावाकडे पाठवून दिले. दरम्यान, रात्री सिराज शेख हा दिपाली यांच्या दुकानात आला. मोटारसायकलच्या धक्क्याबाबत विचारणा करत त्याने दिपाली यांच्या पतीला धक्काबुक्की करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दिपाली यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की करून धमकी दिली.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचल्याने संबंधित व्यक्ती तेथून निघून गेला. त्यानंतर दिपाली यांनी पतीला उपचारासाठी रुग्णालयात नेले. उपचारानंतर परतत असताना पुन्हा मोरया हॉस्पिटलसमोर वाद झाला. यावेळी सिराज शेख याने दिपाली यांच्याशी गैरवर्तन केले. तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारी भाषा वापरून दंगल घडवण्याची धमकी दिली आहे.
या प्रकरणी दिलापी यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम 74, 76, 115(2), 351(2), 352, 329(3) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल गवळी करीत आहेत.







