पुणे, ता. 20 : पुणे-सोलापूर-वाडी रेल्वे मार्गावरील वाढती वाहतूक आणि भविष्यातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. या मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्याच्या प्रकल्पाला वेग आला असून, मांजरी स्थानकापासून या नव्या मार्गिकांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास अधिक सुखकर, वेगवान आणि वेळेची बचत करणारा होण्याची अपेक्षा आहे.

मांजरी स्थानकापासून प्रस्तावित तिसरी आणि चौथी मार्गिका पुणे-सोलापूर-वाडी रेल्वे मार्गाच्या क्षमतेत मोठी वाढ करणार आहे. या प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यात सुमारे 92 एकर, तर सोलापूर जिल्ह्यात तब्बल 530 एकर जमीन संपादित केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या भूसंपादनामुळे प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होत आहे. सुमारे 16 हजार कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे रेल्वेचा वेग ताशी 160 किलोमीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. प्रस्तावित नव्या मार्गिकांवर 32 प्रवासी रेल्वे, तसेच 40 हून अधिक मालगाड्या चालविण्याचे नियोजन असल्याने पुणे-सोलापूर-वाडी मार्गावरील वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

मालगाड्यांमुळे प्रवासी गाड्यांना विलंब

पुणे-सोलापूर-वाडी मार्ग हा प्रवासी तसेच मालवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी रेल्वे धावतात. त्याचबरोबर सोलापूर ते वाडी दरम्यान मालगाड्यांचीही मोठी वर्दळ असते.होटगी आणि कुडगी येथील एनटीपीसी प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक केली जाते. त्यामुळे या मार्गावर मालगाड्यांची संख्या लक्षणीय आहे. सध्याच्या दोनच मार्गिकांमुळे प्रवासी आणि मालगाड्यांच्या वाहतुकीचे नियोजन करताना रेल्वेला अनेक अडचणी येतात. मालगाड्यांना मार्ग देताना प्रवासी रेल्वेला क्रॉसिंगसाठी किंवा छोट्या स्थानकांवरील लूपलाइनवर थांबवावे लागते. परिणामी काही वेळा प्रवासाच्या वेळेत वाढ होते.
वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन विस्तार
पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर आणि वाडी या भागांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. औद्योगिक, व्यावसायिक, शैक्षणिक आणि रोजगाराच्या कारणांसाठी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर प्रवास केला जातो. भविष्यात रेल्वेगाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता विद्यमान दोन मार्गिका अपुऱ्या पडू नयेत, यासाठी अतिरिक्त मार्गिका उभारण्यावर भर देण्यात येत आहे.
राष्ट्रीय रेल्वे योजनेनुसार 2030 पर्यंत देशातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर अतिरिक्त मार्गिका उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे-वाडी मार्गाचाही या नियोजनात समावेश असल्याने या मार्गाच्या विस्ताराला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मांजरीपासून नव्या मार्गिकांना सुरुवात
मांजरी स्थानकापासून तिसरी आणि चौथी मार्गिका प्रस्तावित करण्यात आली आहे. या मार्गिका पुण्याच्या दिशेने येणाऱ्या विद्यमान अपलाइनच्या बाजूने असणार आहेत. पुढे पुणे-दौंड-कुर्डुवाडीपर्यंत या मार्गिकांचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.सोलापूर शहराजवळ मात्र नव्या मार्गिकांची रचना वेगळी असणार आहे. या मार्गिका शहराच्या बाहेरील भागातून नेऊन सोलापूर स्थानकाला बायपास करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर तिलाटी स्थानकाजवळ या दोन्ही मार्गिका पुन्हा विद्यमान रेल्वे मार्गाशी जोडण्यात येणार आहेत.
प्रवाशांना मोठा फायदा
तिसरी आणि चौथी मार्गिका उपलब्ध झाल्यानंतर पुणे-सोलापूर-वाडी मार्गावरील रेल्वे वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
सध्या क्रॉसिंगसाठी किंवा लूपलाइनवर थांबणाऱ्या गाड्यांना नव्या मार्गिकांमुळे अधिक मोकळा मार्ग मिळू शकतो. त्यामुळे रेल्वेचा प्रवास वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल. परिणामी प्रवाशांचा वेळ वाचण्याबरोबरच रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.या प्रकल्पाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रेल्वेचा वेग वाढविण्याचे नियोजन. सध्याच्या तुलनेत नव्या पायाभूत सुविधांमुळे रेल्वेचा वेग ताशी 160 किलोमीटरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर दरम्यानचा प्रवास भविष्यात अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे.
एका किलोमीटरसाठी 39.40 कोटींचा खर्च
तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. प्रस्तावित प्रकल्पात प्रति किलोमीटर सुमारे 39.40 कोटी रुपये, तर प्रति ट्रॅक किलोमीटर सुमारे 16.76 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भूसंपादनाचा खर्च वगळता प्रति ट्रॅक किलोमीटर सुमारे 12.87 कोटी रुपये खर्च होणार आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित केली जाणार असल्याने भूसंपादनाचा खर्चही महत्त्वाचा ठरणार आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्याने प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.







