विशाल कदम
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील अस्मिता हायस्कूलसमोर भांडणाच्या उद्देशाने लाकडी दंडुके घेऊन फिरणाऱ्या 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यातील तीन जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी 85 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
विकास उर्फ आबा लक्ष्मण तरंगे (वय 22, रा. दत्तवाडी, उरूळी कांचन, ता हवेली), गणेश कुंभार (बाजार मैदान, उरूळीकांचन), आप्पा लोंढे (रा. गोळे वस्ती, उरूळी कांचन), सोनु सातव, रा. भवरापुर, ता हवेली) महेंद्र गाडे (रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन), प्रेम अडसुळ (रा. आर जीवन बँकेसमोर, उरूळी कांचन) व दोन 17 वर्षीय अल्पवयीन मुले (रा. सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमोल संजय खांडेकर (वय 29, पोलीस अंमलदार, उरूळी कांचन पोलीस ठाणे, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील बायप रस्त्यावर काही जण हातात पाईप व लाकडी काठ्या घेऊन भांडणे करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना सोमवारी (ता.18) पाचच्या सुमारास मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा पोलिसांना तिघेजण पाईप व लाकडी काठ्या घेऊन दुचाकीवरून फिरताना आढळून आले. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना ताब्यात घेतले. तर 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नये. यासाठी शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, सुरे, काठी किंवा झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तूबरोबर नेणे, आणणे दगड अगर तत्सम वस्तू, शस्त्रे हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ८ मार्च ते २१ मार्च यादरम्यान १४ दिवसांसाठी बंदी घातली होती. तसेच या आदेशाचे उल्लंघन करताना कोणी आढळून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस अंमलदार अमोल खांडेकर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड करत आहेत.