लोणी काळभोर: भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याच्या आणि त्यांना पकडण्याच्या नावाखाली लोणी काळभोर परिसरात एक धक्कादायक अन् संशयास्पद प्रकार समोर आला आहे. मंगळवारी (ता. 29) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर (ता. हवेली) हद्दीतील एमआयटी परिसर आणि राहिंज वस्ती भागात हा प्रकार उघडकीस आला आहे.

श्वान गाडीतील काही तरुण पुणे शहर व परिसरातून 20 ते 25 श्वान वाहनातून पकडून आणतात. पकडलेले श्वान गाडीतून ज्या ठिकाणी कोणी पाहत नाहीत अशा ठिकाणी आणून सोडतात. व त्यातील नागरिकांना दाखवण्यासाठी अवघे दोन ते तीन श्वानच परत गाडीत पकडून घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील एमआयटी कॉलेज आणि राहिंज वस्ती परिसरात मंगळवारी काही तरुण श्वान पकडणारी गाडी घेऊन आले होते. श्वान पकडण्याची कारवाई सुरू असल्याचे भासवून या मुलांनी अचानक 20 ते 25 श्वान त्या परिसरात सोडून दिले. असा आरोप परिसरातील काही नागरिकांनी केला आहे. त्यानंतर काही वेळाने केवळ 2 ते 3 श्वान पकडून गाडीत टाकून उर्वरित सर्व श्वान त्याच परिसरात सोडून त्यांनी तिथून काढता पाय घेतला.

हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित परप्रांतीय तरुणांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र काही तरुणांनी आम्ही नवीन आहोत आपल्याला शहर व ग्रामीण याबाबत काही माहिती नसल्याची माहिती दिली. या भागातील भटके श्वान आपल्या वस्तीत आणून सोडल्याने परिसरात भटक्या श्वानांची संख्या अचानक वाढली असून, लहान मुले व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा प्रकारे दुसऱ्या भागातील श्वान आणून वस्तीत सोडल्याने राहिंज वस्ती आणि एमआयटी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण आहे. “जेवढे श्वान या परिसरात आणून सोडले आहेत, ते सर्वच्या सर्व श्वान तत्काळ इथून पकडून घेऊन जावे,” अशी आक्रमक मागणी राहिंज वस्ती परिसरातील संतप्त नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, श्वान पकडण्याच्या नावाखाली अशा प्रकारे नियमबाह्य कृत्य करणाऱ्या संस्था किंवा तरुणांवर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.






