पुणे : मतदार ओळखपत्रातील माहिती दुरुस्त करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी पुण्यातील 2 ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले आहे. निवडणूक आयोगाचा अधिकारी असल्याचे भासवून भामट्यांनी दोघांच्या बँक खात्यांतून एकूण 16,92,022 रुपये परस्पर काढून घेतले. अवघ्या 5 रुपयांचे शुल्क भरण्यास सांगून नागरिकांना जाळ्यात ओढण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

येरवडा येथील ब्लू हिल सोसायटीत राहणारे 80 वर्षीय कांजाशेरी वैद्यनाथन व्यंकटेशन हे टाटा मोटर्समधून निवृत्त झाले आहेत. 7 ऑक्टोबर रोजी त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने आपण निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. मतदार ओळखपत्र अपडेट करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवून 5 रुपये शुल्क भरण्यास सांगितले.

व्यवहार पूर्ण झाला नसल्याचे सांगून फोन बंद करण्यात आला. मात्र, त्यानंतर व्यंकटेशन यांच्या पत्नीच्या खात्यातून 2.5 लाख रुपये आणि त्यांच्या स्वतःच्या खात्यातून आणखी 2.5 लाख रुपये काढण्यात आले. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत स्वारगेट परिसरातील आदिनाथ सोसायटीत राहणारे 79 वर्षीय गिरीश राठीलाला शहा यांना आर्थिक फटका बसला. त्यांच्या व्यावसायिक भागीदाराच्या मतदार ओळखपत्रावरील नावात दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी ऑनलाइन अर्ज केला होता.
यानंतर एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून फॉर्म क्रमांक 8 भरावा लागेल, असे सांगितले. यासाठी 5 रुपये शुल्क भरण्यास सांगण्यात आले. यूपीआयद्वारे पैसे भरण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचा संदेश आला. मात्र, नंतर खात्यातून 4,99,011 रुपये आणि 6,93,011 रुपये असे एकूण 11,92,022 रुपये अन्य खात्यांत हस्तांतरित झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.








