पुणे: पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणाऱ्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत नागरिकांचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा विश्रामबाग पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणातील 3 आरोपींना गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे, आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सुमारे 4,500 किलोमीटरचा प्रवास केला. या कारवाईत 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होते. विशेषतः विसर्जन मिरवणुकीत नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असते. याच गर्दीचा गैरफायदा घेत काही चोरटे दागिने चोरत असल्याचे समोर आले होते. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा चोरीच्या घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
तांत्रिक तपासाच्या मदतीने संशयितांचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान आरोपी हरियाणातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपी गुजरातमधील अरवली पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे पथक गुजरातला रवाना झाले आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

अजय समशेर विनोदकुमार रुपसिंग कोळी (वय 20), अमन समशेर अनिल कुमार नारायणसिंग कोळी (वय 24) आणि दीपक समशेर राजुभाई सापसिंग (वय 21), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही हरियाणातील रहिवासी आहेत.

पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी पुण्यात गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन 9 चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली सुमारे 10 लाख रुपये किमतीची कार आणि 13 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत 23 लाख रुपये आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.







