पुणे : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गा शेजारील सेवा रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे दौंड तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे यांच्या नेतृत्वात पाटस येथे सेवा रस्त्यावर वृक्षारोपण करीत आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे टोल नाका प्रशासनाला देण्यात आला आहे. दौंड तालुक्यातून जाणाऱ्या पुणे सोलापूर (क्र. ६५) या राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या सेवा रस्त्यावर यवत, वरवंड, पाटस, कुरकुंभ, मळद, खडकी आदि गावांच्या हद्दीत सेवा रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. प्रशासनाचे याकडे कळत नकळत दुर्लक्ष होत असून या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत.
गावातील नागरिक या सेवा रस्त्यावरून सातत्याने ये जा करत असतात, सेवा रस्त्यावरून जाताना नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. तर पडलेले खड्डे, त्यामध्ये साठलेल्या पाण्याचा व खड्ड्याचा अंदाज न आल्याने अपघात घडत आहेत. दौंड तालुक्यातील यवत, वरवंड, पाटस, कुरकुंभ, मळद, खडकी आदि गावांच्या हद्दीतील सेवा रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावेत अन्यथा येत्या आठ दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी पाटस येथे पडलेल्या खड्ड्यात वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी करण रणधीर, युवराज दामोदरे, राहुल झेंडे , मयूर पानसरे, जुनेद तांबोळी, राजेंद्र घाडगे, शशिकांत गायकवाड, संकेत पानसरे यांसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.