हडपसर, ता. 12 : देवघराच्या खिडकीची काच काढून लक्ष्मीपूजन करून देवासमोर ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. हडपसरमधील नेताजी सुभाष गृह रचना सोसायटीत रविवारी (ता. 08) रात्री लक्ष्मीपूजनानंतर मध्यरात्री दीड ते सोमवारी (ता. 09) सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. या घरफोडीत तब्बल 47 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

याप्रकरणी अजित रामचंद्र वाडेकर (वय-49, रा. बंगला क्रमांक 11, नेताजी सुभाष गृह रचना सोसायटी, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडेकर कुटुंबीयांनी रविवारी लक्ष्मीपूजनानिमित्त रात्री साडेसातच्या सुमारास घरातील मंदिरात पूजा केली होती. पूजेनंतर सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मंदिरासमोर ठेवण्यात आली होती. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास कुटुंबातील सर्वजण झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातच्या सुमारास वाडेकर यांचे वडील रामचंद्र हे पूजेसाठी देवघरात गेले असता तेथे ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ मुलाला याची माहिती दिली. अजित वाडेकर यांनी देवघरात पाहणी केली असता पूजेचे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच देवघराशेजारील काचेची खिडकी उघडी असल्याचे आढळले.

चोरट्यांनी खिडकीची काच काढून घरात प्रवेश केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याचा लक्ष्मीहार, गंठण, सोन्याच्या माळा, तोडे, नेकलेस, अंगठ्या आणि गळसरी अशा विविध दागिन्यांचा समावेश आहे. या सोन्याच्या दागिन्यांची अंदाजे किंमत 35 लाख 62 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याशिवाय 500, 200, 100, 50, 20 आणि 10 रुपयांच्या नोटांच्या बंडलमधील 11 लाख 57 हजार रुपयांची रोकडही चोरट्यांनी लंपास केली. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण 47 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक शुभम शिंदे पुढील तपास करीत आहेत.







