लोणी काळभोर, (पुणे) : रेल्वेने दिलेल्या धडकेत एका 20 वर्षीय वीटभट्टी कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात सोमवारी (ता.४) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
सुरज नानला भिलाला (वय-२०, रा. बोरकरवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, मूळ रा. मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नानला भिलाला व त्यांचे कुटुंब बोरकर यांच्या वीटभट्टी काम काम करत होते. नानला भिलाला हे पत्नी व दोन मुलांसह बोरकर परिसरात राहत होते. लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात सुरजला सोमवारी (ता.४) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास रेल्वेने धडक दिली. या अपघाताची माहिती रेल्वे चालकाने रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर नियंत्रण कक्षाने ही माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार ईश्वर भगत, महेश करे, राहुल कर्डिले तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा सुरजचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मात्र, सूरजचा अपघात, घातपात की, आत्महत्या याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतन धेंडे करत आहेत.