लोणी काळभोर (पुणे) – यशवंतच्या निवडणुकीत उमेदवार म्हणुन एका खाजगी कारखान्याचे मालक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने, प्रतिष्ठेच्या बनलेल्या हडपसर – मांजरी, फुरसुंगी या चार नंबर गटातही प्रकाश जगताप व प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखालील “शेतकरी विकास आघाडी” ने विजयाचा डंका वाजवला असुन, या आघाडीचे अमोल प्रल्हाद हरपळे व राहुल सुभाष घुले हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. तर याच गटात उमेदवार असलेले एका खाजगी कारखान्याचे मालक व यशवंतचे माजी संचालक राजीव शिवाजीराव घुले व त्यांच्या सहकारी सुरेश फकीरराव कामठे यांना पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.
हडपसर – मांजरी, फुरसुंगी या चार नंबर गटातील प्रकाश जगताप व प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखालील “शेतकरी विकास आघाडी”चे उमेदवार अमोल प्रल्हाद हरपळे यांना ५४०८ तर राहुल सुभाष घुले यांना ५५०२ मते मिळाली आहेत. तर पराभुत उमेदवार राजीव शिवाजीराव घुले यांना ४७७४ मते तर सुरेश फकीरराव कामठे यांना ४४८० मतांच्यावर समाधान मानावे लागले आहे.
दरम्यान आत्तापर्यंत उरुळी कांचन-शिंदवने, सोरतापवाडी, नायदगाव-कोरेगाव मुळ, लोणी काळभोर-थेऊरसह हडपसर – मांजरी, फुरसुंगी या महत्वाच्या चार गटांचा निकाल जाहीर झाला असुन, चार गटातील एकरापैकी दहा जागा “शेतकरी विकास आघाडी” ने जिंकल्या असुन, केवळ लोणी काळभोर गटातील एकाच जागेवर रयत सहकारी पॅनेलचा उमेदवार विजयी झालेला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, माजी सभापती व विद्यमान संचालक प्रकाश जगताप, बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी” या पॅनेलने जाहीर झालेल्या तीन गटातील नऊही जागा जिंकत, कारखान्यावर एकहाती सत्ता मिळवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. तर या निवडणुकीत हवेलीचे जेष्ठ नेते माधव काळभोर, हवेली बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, बाजार समितीचे विद्यमान संचालक रोहिदास उंद्रे यांच्या प्रमुख नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल” मोठा पराभाव स्विकारावा लागणार असल्याची चिन्हे दिसुन येत आहेत.
उरुळी कांचन-शिंदवने या दोन नंबर गटामध्ये शेतकरी विकास आघाडीचे संतोष आबासाहेब कांचन यांना सर्वाधिक ५६७० मते मिळवुन विजयी झाले असुन, त्यांच्या खालोखाल सुनिल सुभाष कांचन यांना ५४९६ मते तर सुशांत सुनिल दरेकर यांना ५०८० एवढी मते मिळाली आहेत. तर दुसरीकडे पराभुत उमेदवारांच्या पैकी विकास विलास आतकिरे यांना सर्वाधिक ४८६५ तर दुसरे पराभुत अजिंक्य महादेव कांचन यांना ४४९७ मते तर तिसरे उमेदवार अमित भाऊसाहेब कांचन यांना ४१९६ एवढी मते मिळाली आहेत.
सोरतापवाडी, नायगाव व कोरेगाव मुळ या गट क्रमाक दोन मधील “शेतकरी विकास आघाडी” चे शशिकांत मुरलीधर चौधरी (५२११), विजय किसन चौधरी (५२५२) तर याच गटातील तिसरे उमेदवार ताराचंद कोलते ५१०५ मते मिळवुन विजयी झाले आहेत. तर पराभुत लोकेश कानकाटे (४४८३), राजेंद्र चौधरी (४७३३) तर तिसरे पराभुत उमेदवार मारुती चौधरी यांना ४३३१) मते मिळाली आहेत.
लोणी काळभोर-थेऊर या तीन नंबर गटात “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी” या पॅनेलचे नवनथ तुकाराम काकडे विजयी झाले आहेत. याच पॅनेलचे दिग्गज उमेदवार तथा हवेली बाजार समितीचे माजी संचालक अप्पासाहेब रंगनाथ काळभोर व राहुल मधुकर काळभोर या दोघांना पराभावाचा सामना करावा लागला आहे. रयत सहकारी पॅनेलवर लोणी काळभोर परीसरातील अनेक दिग्गज नेते काम करत असल्याने, या गटातील उमेदवाराना जिंकण्याची मोठी आशा होत. मात्र प्रकाश जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या नियोजनबध्द प्रचारामुळे माधव काळभोर यांच्या एकच उमेदवारांला विजयाची चव चाखता आली आहे. मोरेश्वर पांडुरंग काळे यांना ५२६८ तर योगेश प्रल्हाद काळभोर यांना ४९५१ मते मिळाली. तर नवनाथ काकडे यांना ५१३१ एवढी मते मिळाली. तर पराभुत उमेदवार अप्पासाहेब रंगनाथ काळभोर यांना ४७९९ , राहुल मधुकर काळभोर यांना ४३३० तर अमर काळभोर यांना ४८४२ मते मिळाली.