पिंपळवंडी : जुन्नर तालुक्यातील काळवाडी (Kalawadi) येथील काळेस्थळ वस्ती परिसरात आज बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने (Leopard) आठ वर्षाच्या बालकावर हल्ला केला. या हल्ल्यात रुद्र महेश फापाळे (Rudra Phapale) या बालकाचा मृत्यू (Death of a child) झाल्याची माहिती समोर आली आहे.
फापाळे हे मूळचे बदगी बेलापूर येथील रहिवासी आहेत. हे सर्वजण यात्रेनिमित्त काळवाडी येथे त्यांच्या नातेवाईक रोहिदास काकडे यांच्याकडे आले होते. रुद्रची आई कालच (मंगळवारी) पुन्हा आपल्या गावी गेली असता आज बुधवारी सकाळी ही घटना घडली.
आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रुद्र हा घराजवळ खेळत होता. घराच्या बाजूला गोठ्याजवळ रुद्र गेला तितक्यात अचानक बिबट्याने जवळ येऊन त्याच्यावर हल्ला केला आणि परत त्याला उचलून घेऊन गेला. यावेळी बाजूच्या उसाच्या शेतात त्या बालकाचा मृतदेह आढळला.
यावेळी सदर घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काळवाडी परिसरातील ग्रामस्थ संतापले. वारंवार होणारे हे बिबट्याचे हल्ले थांबविण्यासाठी वनविभाग तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या विषयाकडे गांर्भीयाने लक्ष देण्याची मागणी यावेळी ग्रामस्थ करीत आहेत.