बावडा, (ता. इंदापूर) : वडापुरी (ता. इंदापूर जि. पुणे) येथील अंबाजी लिंबाजी देवस्थानच्या पुजारी पुष्पा शंकर कोमकर (वय ५५) या मृत अवस्थेत स्थानिक ग्रामस्थांना आढळून आल्या आहेत. कोमकर महिला पुजारी या गंभीर स्वरूपाच्या तसेच रक्तबंबाळ अवस्थेत स्थानिक ग्रामस्थांना आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर तात्काळ त्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पुष्पा कोमकर महिला पुजारी यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्यांचा मृत्यू हा धक्कादायक घटनेतून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी इंदापूर पोलिसांचे पथक दाखल झाले असून अधिक तपासासाठी पुणे येथील डॉग स्कॉड व न्यायवैद्यक पथक बोलावण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा कोमकर या श्री अंबाजी लिंबाजी देवस्थान येथे गेल्या २० ते २५ वर्षापासून पुजारी म्हणून सेवा करत होत्या. तसेच त्या तेथेच कायम वास्तव्यास असून किराणा दुकान चालवत उदरनिर्वाह आपल्या पतीसह करीत होत्या. आज १३ मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर स्वरूपाचे घाव तीन ते चार ठिकाणी रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत आढळून आल्या.
कोमकर यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील तपासानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी सांगितले आहे.