दौंड (पुणे): पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी अधिकारी म्हणून काम करणारे किसन दत्तोबा भुजबळ (वय ५५,रा . चंदननगर, पुणे) यांचे शुक्रवारी २३ फेब्रुवारीला रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. एक निर्भिड, डॅशिंग आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून संपूर्ण जिल्ह्याला त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
किसन भुजबळ हे पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे तालुक्यातील कासारी येथील मुळ गावचे रहिवासी होते. भुजबळ यांची काही दिवसांपूर्वी बायपास सर्जरी झाली होती. शुक्रवारी रात्री अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भुजबळ यांनी पुणे, हवेली, भोर, जुन्नर, दौंड तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केले होते. सध्या ते मुळशी तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. दौंड तालुक्यात गटशिक्षणाधिकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी बेकायदा आणि बोगस शाळांवर धडक कारवाई केली होती. ही कारवाई थांबवण्यासाठी त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे राजकीय दबाव आणला गेला होता. मात्र, त्यांनी या दबावाला बळी न पडता तालुक्यातील बोगस शाळांवर कारवाई सुरु ठेवल्याने त्यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्या या बदली विरोधात अनेक सामाजिक संघटना आणि पालकांनी मोठ्या प्रमाणावर निषेध केला होता.
त्यांच्या या निर्भिड आणि आक्रमक कामकाजामुळे शिक्षण विभागात त्यांचा मोठा दबदबा होता. मात्र, शुक्रवारी त्यांच्या निधनाची बातमी येताच शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.