संदिप टूले
पुणे : वाढदिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. कारण वाढदिवस हा आपल्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस असतो. त्यामुळे प्रत्येक जण आपला वाढदिवस काही तरी वेगळे करून साजरा करण्याच्या प्रयत्नात असतो. असाच वेगळा प्रयत्न मुख्याध्यापक श्री.मोतीराम राठोड यांनी आपल्या वाढदिवशी केला आहे. ज्यातून समाज भान जपण्याचा संदेश देखील दिला गेला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरवडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.मोतीराम राठोड यांनी त्यांच्या स्वतःच्या व इतर मंडळींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिरवडी व मेमाणवाडी येथील मागील वर्षात काही मृत झालेल्या 15 कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या स्मरणार्थ प्रत्येकाच्या घरी जाऊन, त्या कुटुंबातील सदस्य,व गावातील पदाधिकारी यांच्या हस्ते आंब्याच्या झाडांचे वृक्षारोपण केले. या समाज भान जप्त साजरा केलेल्या वाढदिवसाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी मुख्याध्यापक राठोड म्हणाले, वाढदिवस अश्या पद्धतीने साजरा करण्यामागील हेतू हा होता, की जे दिवंगत व्यक्तीं आपल्यातून गेले आहेत. त्यांची आपल्याला झाडांच्या रूपाने आठवण रहावी व समाज्यात वाढदिवस साजरा करण्याची एक चांगली पद्धत सुरु रहावी, ज्यातून काही तरी शिकता येईल. म्हणून अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे. या वृक्ष रोपणावेळी दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शिंदे , सरपंच शांताराम थोरात, उपसरपंच कल्याणी कोंडे , सोसायटीचे चेअरमन निलेश फणसे ,भाऊ थोरात, हरिभाऊ शेंडगे ,प्रवीण कांबळे, रवी काळे, दादा थोरात, अभिजित धायगुडे, आण्णा गावडे व दिवगत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
ही झाडे आपल्या कुटूंबातील दिवंगत व्यक्तींच्या स्मरणार्थ असल्याने, त्या वृक्षांची जोपासना अधिक आस्थेने यशस्वी होईल. तसेच सरांनी जो संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तो संदेश आम्ही नक्कीच आमलात आणण्याचा प्रामाणिक प्रयत करणार आहोत. तसेच सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या मुख्याध्यापक राठोड सरांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो.
श्री.सागर शेलार, माजी सरपंच. मिरवडी