पुणे : महाराष्ट्र राज्य आयुक्त, आरोग्य सेवा आणि अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र राज्य गुणवत्ता आश्वासन कक्ष आणि जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने बिजवडी ( ता. इंदापूर, जि. पुणे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास सलग दुसऱ्या वर्षी आरोग्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल कायाकल्प पुरस्काराने गौरविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा यांनी दिली.
स्वच्छ वातावरणामुळे आरोग्य सुधारते आणि रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होते, तसेच आरोग्य सुविधेतील रुग्णांचा अनुभव वाढतो म्हणून तत्कालीन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी १५ मे २०१५ रोजी ‘ स्वच्छ भारत मिशन ‘चा विस्तार म्हणून ‘कायाकल्प पुरस्कार योजना सुरू केली. रोख रक्कम रुपये ५० हजार, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. देशातील सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधांमध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि संसर्ग नियंत्रण पद्धती सुधारणे आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुविधांना प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, डॉ. वामन गेंगजे, डॉ. बालाजी लकडे, डॉ. सचिन एडके, डॉ. अभय तिडके, प्रमोद गायकवाड, रुपाली केजकर यांच्या मार्गर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आदर्श कामगिरीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याची भावना डॉ. सुश्रुत शहा यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी डॉ. समता सरवदे, प्रवीण क्षिरसागर, देवेंद्र उत्तेकर, बनसिद्ध कुंभार, बालाजी गडदे, सुलभा काळे, रिजवाना तांबोळी, प्रतिक लोंढे, अतुल तोंडे, संदीप सर्व सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा पुरस्कार मिळाल्याचे डॉ. सुश्रुत शहा यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यातील बिजवडी सोबतच निरवांगी, लासुर्णे, पळसदेव, निरनिमगाव, काटी येथील आरोग्य केंद्रांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, विस्तार अधिकारी संतोष बाबर, सचिन जाधव यांनी समाधान व्यक्त केले तसेच इतर आरोग्य केंद्रांनीही यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रास देश पातळीवरील सर्वोच्च पुरस्कार मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व कटिबध्द असल्याचे शेवटी डॉ. सुश्रुत शहा यांनी सांगितले.