पुणे: पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे काही दिवस बंद ठेवण्यात आलेला ताम्हिणी घाट आता गुरुवारपासून पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. प्रशासनाने रस्त्याची पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे ताम्हिणी घाटातील पुणे-कोलाड राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. डोंगरवाडी परिसरात अनेक ठिकाणी रस्ता खचला होता. तसेच काही भागांत दरडी कोसळल्यामुळे आणि रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांसाठी धोका निर्माण झाला होता. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने खबरदारी म्हणून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता.

घाट बंद झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले. रस्त्यावर आलेली माती, दगड आणि मलबा हटवण्यात आला. तसेच खराब झालेल्या भागांची दुरुस्ती करण्याचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले.
मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरवाडी परिसरातील खचलेल्या रस्त्याचे काम आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेल्या मोऱ्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारपासून ताम्हिणी घाट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, घाट खुला करण्यात आला असला तरी प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही निर्बंध कायम ठेवले आहेत. सध्या या मार्गावर केवळ हलकी आणि प्रवासी वाहने चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जड वाहनांना अद्याप या मार्गावर प्रवेश दिला जाणार नाही.






