पुणे: पुणे जिल्ह्यातील निघोजे परिसरातून एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने एका 25 वर्षीय महिलेचा आणि तिच्या दीड वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हा अपघात रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. हरिदास दिगंबर उतलवाड (वय 40) हे दुचाकीवरून मंगल प्रल्हाद चोपलवाड (वय 25) आणि त्यांचा लहान मुलगा देवांश चोपलवाड यांना घेऊन जात होते. ते निघोजे परिसरात आले असताना मागून वेगाने आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात मंगल चोपलवाड आणि त्यांचा दीड वर्षांचा मुलगा देवांश यांना गंभीर दुखापत झाली. मात्र, उपचार मिळण्यापूर्वीच दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मृत मंगल आणि त्यांचा मुलगा देवांश हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील होते. सध्या हे कुटुंब पुणे परिसरात राहत होते. या अपघातात दुचाकी चालवणारे हरिदास उतलवाड हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. मृत महिलेचे नातेवाईक माधव नारायण चोपलवाड (वय 32) यांनी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी कंटेनर चालक सचिन यादव (रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू असून, कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेने एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर काही क्षणांत संकट कोसळले आहे.






