पुणे: जेजुरी पोलीस ठाण्यात 2022 मध्ये दाखल झालेल्या पोक्सो प्रकरणात शिवाजीनगर (पुणे) येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी वसंत उर्फ बंटी संपत शिंदे (वय 46, रा. जेजुरी,ता.पुरंदर,जि.पुणे) याला विविध कलमांखाली दोषी ठरवत साडेचार वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली आहे.या निकालामुळे अल्पवयीनांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये प्रभावी तपास व सक्षम पुराव्यांच्या आधारे न्यायालयीन मांडणीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

या प्रकरणात जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 151/2022 अन्वये पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.आरोपी वसंत उर्फ बंटी संपत शिंदे याला 3 मे 2022 रोजी अटक करण्यात आली होती.

या खटल्याची सुनावणी मा.जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. आर.जाधव सो. यांच्या न्यायालयात झाली.न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड विधान कलम 452 अंतर्गत दोषी ठरवत 4 वर्षे 3 महिने सक्त कारावास व रुपये 2,000 दंड,दंड न भरल्यास 15 दिवसांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.
तसेच भारतीय दंड विधान कलम 354 आणि पोक्सो कायद्यातील कलमांच्या अंतर्गतही आरोपीला दोषी ठरवत 3 वर्षांचा कारावास व ₹2,000 दंड,दंड न भरल्यास 15 दिवसांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एन.एच. सोनवलकर(सध्या नगर येथे कार्यरत)यांनी केला.सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड.अंजली भगत आणि ॲड.व्ही. एच.विभुते यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
या प्रकरणात जेजुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास व न्यायालयीन कार्यवाही पार पडली. तसेच कोर्ट कर्मचारी रोहिदास खाडे,पुणे सेशन कोर्ट पैरवी अंमलदार जीपीएसआय विद्याधर निचित आणि जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी मसपोनि माधुरी तावरे यांनीही खटल्याच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली.
या निकालामुळे अल्पवयीनांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दोषींना कठोर शिक्षा देण्याबाबत न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतल्याचे अधोरेखित झाले असून, अशा गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल,अशी प्रतिक्रिया न्यायालयीन वर्तुळातून व्यक्त होत आहे.







