मावळ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे बघायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. अशातच महाविकास आघाडीने मोठा निर्णय घेतला आहे. मविआतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात महाविकास आघाडीने उमेदवार न देता थेट अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे आता सुनील शेळके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सुनील शेळकेंच्या अधचणीत वाढ…
मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांची ताकत वाढली असून मावळ विधानसभा निवडणुकीत आता राजकीय रंगत निर्माण झाली आहे.
यापूर्वीच तालुक्यातील भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह हजारो भाजप कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देऊन महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या उमेदवारीचा जाहीर निषेध केला होता. महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना विजयी करण्याचा निर्धार केला असल्याने आमदार सुनील शेळके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सध्या मावळात बापू भेगडे अपक्ष तर महायुतीचे सुनील शेळके यांच्यात सामना रंगणार आहे.
.