पुणे : राज्यात गेले काही दिवस झाले पावसाने जोर पकडला असून पुणे जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढले आहे. पुणे परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं होतं. या पावसाचं पाणी पुण्यातील अनेक भागांत शिरलं होतं, अनेकांच्या घरात, कॉलनीत आणि वस्त्यांमध्येही हे पाणी शिरल्याने पुणे महापालिका प्रशासनाच कारभार चव्हाट्यावर आला आहे.
वर्षा पर्यटनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यंटक पुण्यात येत आहेत. पुण्यातील काही निसर्सरम्य ठिकाणांना भेटीही देतात. काही दिवसांपूर्वी घडलेल्या काही दुर्घटनानंतर पुणे जिल्ह्यातील धोक्याची पर्यटनस्थळ, पाणी प्रवाहित असलेली ठिकाणं पर्यंटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. आता, पुण्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेले ठिकाण म्हणजे सिंहगड किल्ला, आता सिंहगड किल्लाही पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
सिंहगड किल्ला पुढील काही दिवसांसाठी बंद
सिंहगड किल्ला पुढील काही दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर डोंगराचा मोठा भाग, मोठ्या झाडांसह कोसळून रस्त्यावर आला आहे. त्यामुळे सिंहगड किल्ल्यावर जाणारा रस्ता बंद झाला असून वन विभागाकडून देखील दरड हटवण्याचं काम सुरू आहे. मात्र, दगड आणि मातीचं प्रमाण मोठं असल्यानं ही दरड हटवण्यास काही दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, सिंहगड किल्ल्यावर वाहनांना तोपर्यंत जाता येणार नाही, अशी माहिती आहे.
मागील दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस काही प्रमाणात कमी झाला असून मात्र, या मुसळधार पावसामुळे घाट परिसरात व डोंगर, किल्ल्यांवरील प्रदेशात दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या आठवड्यातील पावसामुळे सिंहगडावरदेखील दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. सिंहगड किल्ल्यावरील काही भागात दरड कोसळली असून या दरडी हटविण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे, हा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.