बारामती : राज्यात मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. जिल्ह्यात खून, दरोडे, गोळीबार, खंडणी अशा अनेक गंभीर गुन्हेगारी घटना घडत आहेत. त्यामुळे बीडची तुलना बिहार राज्याशी केली जात आहे.दुसरीकडे बारामती भाजपच्या आमदार आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘मला बीडची बारामती करायची आहे’ असं म्हणत मोठं विधान केलं आहे.
मतदारसंघातील प्रत्येक कामावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असतं
बारामतीत बोलत असताना त्या म्हणाल्या, मला बीडची बारामती करायची आहे. त्या म्हणाल्या बारामतीत मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे. त्यांनी बारामतीत झालेल्या विकासकामांचं कौतुक केलं. बारामती मतदारसंघातील प्रत्येक कामावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते, असाच विकास मला बीडमध्ये करायचा आहे, अशा आशयाचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. बारामतीमधील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आणि बारामतीतील विकासकामांचं मोठं कौतुक केलं आहे. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, मतदार संघावर दादा बारकाईने लक्ष देऊन असतात. त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. प्रत्येक काम नियोजनबद्धपणे ते करत असतात. “बारामतीच्या विकासाशी दादांचे वेगळे नाते निर्माण झाले आहे, त्यांच्या पाठीची मोठा अनुभव आहे. अनेक वर्षे सत्तेत असल्याचा फायदा बारामतीच्या विकासात झाला आहे. बारामतीत झालेल्या विकासकामांच्या धर्तीवरच माझ्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत .