हवेली : हवेली तालुक्यातील विविध विकासकामांना मंजुरी मिळाली असून, या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. मंजूर विकासकामांचे भूमिपूजन रविवार, दि. 13 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात येत असून सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या शुभहस्ते विविध कामांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी दिली.

तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी रस्ते, मूलभूत सुविधा, ग्रामविकास आणि नागरिकांच्या गरजांशी संबंधित कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. या विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाल्याने अनेक गावांमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. आवश्यक सुविधा निर्माण झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा थेट फायदा होणार आहे.

भूमिपूजन कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती व उपसभापती, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि संबंधित गावांतील ग्रामस्थांचीही कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, विकासकामांसाठी निधी मंजूर झाल्यामुळे हवेली तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. केवळ पहिल्या टप्प्यातील कामांपुरतेच हे नियोजन मर्यादित नसून, पुढील काळात टप्पा 2 अंतर्गत आणखी काही विकासकामांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सभापती युवराज काकडे आणि उपसभापती विद्या गायकवाड यांनी सांगितले.
तालुक्यातील रखडलेली आणि नागरिकांसाठी महत्त्वाची असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले. त्यामुळे आगामी काळात हवेली तालुक्यातील विविध गावांमध्ये विकासकामांना आणखी वेग मिळण्याची शक्यता आहे.







