पुणे : राज्यात सद्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. बैठका, मेळावे होऊ लागले आहेत तसेच बड्या बड्या नेत्यांच्या गाठीभेटी सुद्धा होत आहे. अशातच आता पुण्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आज अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
आमदार अतुल बेनके यांनी याआधी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आज शरद पवार हे उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुका दौऱ्यावर असून शरद पवारांचा जुन्नर तालुक्यातील दौरा सुरू असताना कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी भेट घेतली आहे.
आधीही बेनके यांनी घेतली होती भेट..
या आधी जुलै महिन्यात अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली होती. कोल्हे यांच्या निवासस्थानी अतुल बेनके आणि शरद पवार यांची भेट झाली होती. त्यावेळी अमोल कोल्हेंच्या घरी झालेल्या भेटीनंर शरद पवार यांच्या भेटीनंतर अतुल बेनके यांनी मोठं विधान केलं होतं. ‘राजकारणात काहीही घडू शकते. अगदी शरद पवार आणि अजित पवारही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे पुढे काहीही घडू शकते, असं आमदार अतुल बेनके यांनी म्हटलं होतं.
मंत्री तानाजी सावंतांचा पुतण्या शरद पवारांच्या भेटीला..
राज्यात सद्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता अशातच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी पुण्यात विधानसभेसाठी थेट शरद पवारांची भेट घेतली आहे. पंढरपूर मंगळवेढा जवळच्या भैरवनाथ साखर कारखान्याचा कारभार ते पाहतात. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठीा दावा केल्यानंतर त्यांचा पुतण्या अनिल सावंत पंढरपुर मंगळवेढा मतदारसंघाच्या जागेसाठी इच्छूक असल्याचं कळतंय. आमदारकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ करत तुतारी हाती घेण्याचे मनसुबे दिसत आहेत.