पिंपरी : सोने खरेदीचे पैसे पाठवल्यानंतर सोने न देता भांबुर्डेकर सराफ अँन्ड ज्वेलर्स यांची १ कोटी ८७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २७ ऑक्टोबर २०२३ ते ३० मार्च २०२४ या काळात इंद्रायणीनगर भोसरी येथे घडला.
याप्रकरणी विलास महादेव भांबुर्डेकर (वय-६० रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून भावेश संपतराज जैन (वय-४३ रा. चिंचपोकळी स्टेशन ईस्ट समोर, मुंबई), म्रिनेस प्रितम जैन (वय-२५ रा. शिवाजी पार्ख, कलबादेवी, मुंबई) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भोसरीमध्ये भांबुर्डेकर सराफ अँन्ड ज्वेलेर्स या नावाने सोन्याचे दुकान आहे. फिर्यादी भांबुर्डेकर यांनी बीएसजे बुलीयन मेटल हब एलएलपी कंपनीकडून वेळोवेळी सोने खरेदी केले. कंपनीच्या खात्यावर जमा असलेल्या पैशातून ३० मार्च २०२४ रोजी १ कोटी १६ लाख ४४ हजार १५० रुपयांचे ६६५० दराने १७०० ग्रॅम सोने खरेदी केले.
तसेच ५८ लाख २२ हजार ०७५ रुपये किमतीचे ८५० ग्रॅम सोने खरेदी केले. दरम्यान, फिर्यादी भांबुर्डेकर यांना सोने खरेदीचे बिल बनवून दिले. मात्र, सोने दिले नाही. त्यानंतर बिलात चूक असून दुरुस्ती करुन सोने पाठवतो असे फिर्यादी यांना सांगण्यात आले.
मात्र, आरोपींनी सोने पाठवले नाही म्हणून फिर्यादी यांनी पैशाची मागणी असता त्यांनी सोने व पैसे देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.