पुणे : कोरेगाव भीमामध्ये १ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणाऱ्या शौर्य दिनासाठी सुमारे वीस लाखांहून अधिक अनुयायी येणार असल्याने त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे. त्यासाठी आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच २५० पेक्षा अधिक वैद्यकीय कर्मचारी, ११० एकरवर दोन्ही बाजुंनी ३६ ठिकाणी वाहनतळ उभारण्यात येणार असून ३१ डिसेंबर आणि एक जानेवारी रोजी पीएमपीच्या एकूण १ हजार ५० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चार हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
११० एकरवर ३४ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था
जिल्हा प्रशासन गेल्या तीन महिन्यांपासून शौर्य दिनाच्या तयारीचे नियोजन करत आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम, पोलिस तसेच जिल्हा परिषदेचे सहकार्य घेण्यात येत आहे. यंदा अनुयायांची संख्या १५ ते २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या अनुषंगाने पुढील नियोजन करण्यात येत आहे. गेल्या वर्षी सुमारे १६ लाख अनुयायी आले होते. त्यानुसार ६० एकरवर १७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. यंदा त्यात सुमारे ४० एकरने वाढ करून दोन्ही बाजूला ११० एकरवर ३४ वाहनतळ उभारले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली
दोन दिवस पीएमपी गाड्यांची व्यवस्था
पीएमपीकडून ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी सुमारे १ हजार ५० गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार ३१ डिसेंबरला ४७५ बस दोन शिफ्टमध्ये चालवल्या जातील. तर १ जानेवारीला ५७५ बस दोन्ही बाजूंना चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांसाठी शिक्रापूर येथील पार्किंगच्या ठिकाणी ३१ डिसेंबरला १ हजार ३०० वाहक तर १ जानेवारीला १ हजार ५०० वाहक, चालक तैनात राहणार आहेत. तसेच पुणे पोलीस विभागाकडून पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत. वाहतूकीतील बदलांविषयी नागरिकांना पूर्वसूचना देण्यात येईल.