बबनराव धायतोंडे / दौंड : भिगवण-राशीन रोड हा प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याला कारणीभूत आहेत, बेजबाबदार अधिकारी आणि मुजोर ठेकेदार यांचे ढिसाळ नियोजन. भिगवण राशिन रोडचे सिमेंट काँक्रीट करण्यासाठी १८० कोटी रुपये मंजूर झाले असून हा रोड दौंड तालुक्यातील भीमा नदी एसटी पुलापासून ते बारामती, फलटण असा असून त्याचे बऱ्यापैकी सिमेंट काँक्रीटरीकरण झालेले आहे. परंतु राजेगाव फार्म (ता. दौंड) ते खानवटे गावची कमान नंबर. १ पर्यंत अंदाजे एक किलोमीटर रस्ता काम करणे बाकी आहे.
या स्त्याची किमान डागडुजी करून खड्डे बुजवुन तात्काळ दुरुस्थी होणे गरजेचे आहे. खानवटे पाटी ते राजेगाव फार्म येथील रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडल्याने दररोज अपघात होत आहेत. हा रस्ता वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा असून चार तालुके आणि तिन जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असुन याच रस्त्यावर अनेक अपघात होऊन प्रवाशांचा जिव देखील गेलेला आहे.
अजून किती जिव जाण्याची प्रशासन वाट पाहणार आहे, असा सवालनागरिकांनी उपस्थित केला आहे. या रस्त्यावरून गेली अनेक वर्ष नागरिकांना आणि प्रवाशांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे. म्हणून वाहतुकदार, प्रवासी आणि स्थानिक नागरिक अधिकारी आणि ठेकेदार यांच्या निष्काळजी पणामुळे नाराजी व्यक्त करत आहेत.
याबाबत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. संबंधित मुख्य ठेकेदार व्ही. एच खत्री यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की, शेटफळ आणि खानवटे, राजेगावमध्ये मला शेतकऱ्यांनी भरपूर त्रास दिला आहे. विनाकारण रस्त्याचे काम अडवून लोकांच्या जिवाशी शेतकरी खेळत आहेत. मी रस्त्याचे काम करण्यास तयार आहे. परंतु मला काही शेतकरी रस्त्यावरील खड्डे सुद्धा बुजवू देत नाहीत. यात माझी काही चूक नाही.
भिगवन राशीन रोडचे नवीन काम 90 टक्के पूर्ण होत आले असून खानवटे गावाची कमान ते राजेगाव फार्म पर्यंतचा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. ते तातडीने बुजवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा येथे अपघात होवून अनेक जिव जाण्याची शक्यता आहे.
बापूराव झोंड, माजी अध्यक्ष, खानवटे सोसायटी
नविन सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करण्यासाठी येथील काही स्थानिक शेतकरी न्यायालयात गेले असून, रस्त्याचा वाद न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित आहे. म्हणून सध्या काम बंद आहे, परंतु वस्तुस्थिती पाहता दोन दिवसात तात्काळ खड्डे बुजविण्यात येतील.
डी. एम. चवरे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग-भिगवण