भिगवण (पुणे) : भिगवण ग्रामपंचायतमध्ये अपंग कल्याण निधी अंतर्गत नावनोंदणी केलेल्या ६३ लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आले. सरपंच दिपीका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय परदेशी व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या पाच टक्के अंध, अपंग, दिव्यांग कल्याण निधी म्हणून खर्च करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, हा निधी वाटप करण्यात आला आहे. एकूण १ लाख २६ हजार रुपये वाटप करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधीतील ५ टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. हा निधी दिव्यांगांसाठी वैयक्तिक व सामाजिक स्वरूपाच्या योजनांवर खर्च केला जात असतो.
यावेळी दिव्यांग लाभार्थी यांना संबोधित करताना सरपंच दिपीका क्षीरसागर यांनी आवाहन केले की, आपल्या भागातील रहिवासी दिव्यांग बांधव असतील तर त्यांनी येणाऱ्या कालावधीत भिगवण ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधून या योजनेअंतर्गत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करावी व संबधित लाभार्थी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
दरम्यान, या निधी वाटप कार्यक्रमाप्रसंगी सरपंच दीपिका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख, संजय देहाडे, पराग जाधव, प्रा.तुषार क्षीरसागर, जावेद शेख, दत्ता धवडे, तानाजी वायसे, कपिल भाकरे, रमेश धवडे, गुरप्पा पवार, लाभार्थी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.