भिगवण: भिगवणची तहकूब झालेली ग्रामसभा नुकतीच पार (Bhigwan News) पडली. या ग्रामसभेत ग्रामविकासाशी संबंधित विविध प्रश्नांवरून ग्रामस्थ आणि सत्ताधारी प्रतिनिधींमध्ये (Pune News) सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या योजनेच्या अंमलबजावणीबाबत विचारणा करण्यात आली असता ग्रामपंचायत प्रशासनाकडून समाधानकारक माहिती न मिळाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नागरिकांना सुलभ सेवा, आरोग्य व शिक्षण सुविधा, उपजीविका, आपले सरकार सेवा केंद्रातून विविध शासकीय सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणे, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करणे, ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार करून त्यावर माहिती प्रसिद्ध करणे, गावात सीसीटीव्ही बसविणे तसेच पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करून देणे आदी बाबी अपेक्षित आहेत. मात्र, ग्रामसभेत या अभियानाच्या अंमलबजावणीबाबत विचारलेल्या प्रश्नांना ठोस उत्तरे मिळाली नाहीत, अशी भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयीन कामकाजाबाबतही चर्चा झाली. अधिकारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची, कामांचा पाठपुरावा अपेक्षित पद्धतीने होत नसल्याची तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद मिळत नसल्याची बाब ग्रामस्थांनी सभेत मांडली. कपिल लांडगे, अजय भिसे व सुरज खटके यांनी या संदर्भात आपली मते मांडली. यावर ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय परदेशी यांनी यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.
गावातील भटक्या व त्रासदायक श्वानांबाबत मागील ग्रामसभेत चर्चा होऊनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. या विषयावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी प्रा. तुषार क्षीरसागर यांनी केली.
भिगवण स्टेशन परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जुन्या पाईपलाईनबाबत तसेच गटारांची अवस्था, रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, अतिक्रमण आणि थकीत बिले अशा विविध विषयांवर ग्रामसभेत चर्चा झाली. मात्र, अनेक मुद्द्यांवर समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. अखेरीस सरपंच गुरप्पा पवार यांनी उपस्थितांचे आभार मानून ग्रामसभा संपन्न झाल्याचे घोषित केले.
मंगलदृष्टी सोसायटीच्या पाणीपट्टीबाबत चर्चा
भिगवण येथील मंगलदृष्टी सोसायटीसाठी पाणीपट्टीबाबत वेगळी पद्धत अवलंबण्यात आल्याची माहिती ग्रामसभेत देण्यात आली आहे. संबंधित सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत साठवलेले पाणी गावासाठी वापरले जात असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय परदेशी यांनी सांगितले. मात्र, पाणीपट्टीच्या दरांमध्ये असलेला फरक ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरला असून, याबाबत ॲड. सुरज खटके यांनी आपले मत सभेत मांडले.







