भिगवण : भिगवण ग्रामपंचायतीने यंदा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. एका महिन्याच्या वेतनाएवढाच बोनस कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी कर्मचाऱ्यांनी धुमधडाक्यात साजरी केली. ग्रामपंचायत कर्मचारी वर्षभर प्रामाणिकपणे काम करत असतात. ग्रामस्थांच्या अडचणीच्या वेळी रात्री-अपरात्रीही ते मदतीला तत्पर असतात. कर्मचाऱ्यांच्या कष्टाची दखल घेऊन, यंदा त्यांना एका महिन्याच्या पगाराएवढाच बोनस देण्यात आल्याचे सरपंच दिपीका क्षीरसागर यांनी सांगितले.
पाणीपुरवठा, साफसफाई, वाहनचालक, कार्यालयीन कर्मचारी अशा एकूण २६ कर्मचाऱ्यांना बोनस दिला आहे. तसेच त्यांना सालाबादप्रमाणे कपडे व मिठाईचे देखील वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच दिपीका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख, प्रतिमा देहाडे, स्वाती धवडे, संजय देहाडे, प्रा. तुषार क्षीरसागर, जावेद शेख, गुराप्पा पवार, दत्ता धवडे व कर्मचारी उपस्थित होते.
महिला सदस्यांना दिला मान
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांना प्राधान्य दिले जाते; परंतु या वेळी ग्रामपंचायतीने पाडव्याच्या दिवशी महिला सदस्यांच्या हस्ते वाहनांची पूजा करून नारळ फोडण्याचा मान दिला. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कपडे व मिठाई देऊन सन्मानित केले.