पुणे : बारामती नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामती दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारामतीत मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमाला शरद पवारांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याची माहिती समोर आली आहे.
अशातच आता बारामतीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी फोन करून त्यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विनंतीवरून येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांचे निमंत्रण स्वीकारणार का हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.
बारामतीत येत्या शनिवारी शासकीय कार्यक्रम असताना देखील राज्यसभेचे खासदार असणाऱ्या शरद पवारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं नाही. मात्र, शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे आमंत्रण स्वीकारणार का हे पाहावं लागेल. बारामतीमध्ये शरद पवारांचे घर असल्याने आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बारामतीत येणार असल्याने हे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे.
अथिती देवो भवः ही आमची संस्कृती : सुप्रिया सुळे
बारामतीला जेव्हा कुणीही येतं त्यावेळी शरद पवार हे आवर्जून त्यांना घरी बोलावतात, अथिती देवो भवः ही आमची संस्कृती असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री जर बारामतीला येत असतील तर त्यांना बोलावणे ही आमची संस्कृती असल्याचंही त्या म्हणाल्या.