बारामती : राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वार वाहू लागलं आहे. विशेष म्हणजे बारामती लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा थेट सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा सध्या जोरदार प्रचार सुरु झाला आहे. मात्र, यांच्यामध्ये आता दुसऱ्याच शरद पवारांनी एन्ट्री मारली आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली आहे. कोण आहेत ते पवार जाणून घेऊयात.
पुण्यातील बघतोय रिक्षावाला या संघटनेने जिल्ह्यात चार उमेदवारांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे बारामती मतदारसंघातून शरद पवार नावाच्या एका रिक्षाचालकाला उमेदवारी देण्यात आली असून उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. या उमेदवाराचे नाव शरद पवार आहे. पण हे शरद पवार म्हणजे “शरद राम पवार” आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले “शरद गोविंदराव पवार” हे आहेत.
कोण आहेत शरद राम पवार
पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे शरद राम पवार हे वास्तव्यास आहेत. गेली 5 ते 6 वर्षापासून ते पुणे शहरात रिक्षा चालवतात.आत्ता ते बारामतीच्या रिंगणात उतरले असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सारखं त्यांचं नाव असल्याने त्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. शरद राम पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून रिक्षावाला संघटनेने उमेदवारी दिली आहे.
याबाबत अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर म्हणाले की, व्यवसायातील गीग वर्कर्स यांच्या मागण्यांबाबत कोणत्याही राजकीय पक्षाने गांभीर्य न दाखवल्याने, आम्ही मतदानाद्वारे आमचे आंदोलन मतपेटीतून पुढे नेत आहे. या चार लोकसभा मतदार संघातील, ४ लाख गिग वर्कर्स व त्यांचे १६ लाख कुटुंबीय आमच्याच उमेदवारांना मतदान करून आमची ताकद आम्ही राजकीय पक्षांना दाखवून देऊ असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.
पुणे जिल्ह्यातील उमेदवार पुढील प्रमाणे
१) बारामती – रिक्षाचालक – शरद पवार
२) पुणे – टेम्पो चालक – मनोज वेताळ.
३) मावळ – कॅब चालक – संतोष वालगुडे
४) शिरूर – फूड डिलिव्हरी बॉय – स्वप्नील लोंढे