बारामती, (पुणे) : बारामतीमध्ये पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या जाचाला कंटाळून एका शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ काढून त्या मागच कारण देखील सांगितलं आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हनुमंत सणस असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. ही घटना बारामती तालुक्यातील लाटे या गावात घडली आहे.
याप्रकरणी हनुमंत सणस यांचे बंधू जयवंत सणस यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीनुसार सहा जणांविरोधात शिवीगाळ, दमदाटी करत मानसिक त्रास आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्याचा आत्महत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
हनुमंत सणस यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ करून तो सोशल मिडीयावर शेअर केला होता. ते म्हणाले की, मी हनुमंत 26 फेब्रुवारी 2024 ला आत्महत्या करण्याचा इशारा दिला. मला इतका त्रास दिला आहे. मी या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझे वय 70 वर्ष आहे. माझ्या वावरात अतिक्रमण करुन मला दम देतात. माझ्या खिशात या संदर्भात चिठ्ठी लिहली आहे. वारंवार तक्रार देखील करुन पोलिसांनी उलट मला, माझ्या भावाला आणि मुलाला दम दिला. जिथे अतिक्रमण केले त्याच जागेत मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या चिठ्ठीत ज्यांची नावे आहेत ते माझ्या आत्महत्येला जबाबदार असून त्यांना तात्काळ अटक करावी.
नेमकं प्रकरण काय?
बारामती तालुक्यातील लाटेमध्ये सणस यांचे क्षेत्र आहे. सणस याचं शेत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी विनापरवाना विद्युतधारक विद्युत पंप बसवलेले होते. त्या शेतकऱ्यांना सणस यांनी विद्युत पंप काढायला सांगितले. त्यानंतर हनुमंत सणस आणि त्याचा भाऊ त्यांच्या शेतात जेसीबी घेऊन साफसफाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सणस यांना दमदाटी करून खोट्या केसेस दाखल करू अशी धमकी काही लोकांनी दिली. त्यानंतर वारंवार पोलीस स्टेशन मधून हनुमंत सणस आणि त्यांचे भाऊ यांना फोन येण्यास सुरुवात झाली. या भितीपोटी हनुमंत सणस यांनी आत्महत्या केली, अशी प्रतिक्रिया हनुमंत सणस यांच्या भावाने दिली आहे.
मुख्यमंत्र्यांना केलं होतं निवेदन; 15 मार्चच्या आत मला न्याय द्यावा
हनुमंत सणस यांनी 26 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री कार्यालयासह उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांसह संबंधित कार्यालयांना निवेदन पाठवले होते. या निवेदनात त्यांनी महावितरणची कोऱ्हाळे बुद्रूक शाखा, जलसंपदा विभागाची वडगाव निंबाळकर शाखा तसेच वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते. 15 मार्चच्या आत मला न्याय द्यावा अशी मागणी सणस यांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांना केली होती.