भिगवण, (पुणे) : बारामती-राशीन रस्त्याच्या कामात मुरमा ऐवजी चक्क मातीचा वापर केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे मदनवाडी हद्दीतील कामाची तात्काळ चौकशी करावी आणि रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी मदनवाडीचे ग्रामपंचायत सदस्य तेजस देवकते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
बारामती-राशीन रस्त्याचे काम सुरु असून मदनवाडी हद्दीतील काम हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे. मनमानी पद्धतीने ठेकेदार काम करत असल्याने मागील काही दिवसांपूर्वी अपघात होऊन गावातील एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी ठेकेदाराकडून घेतली जात नाही.
तसेच मुरूम ऐवजी अनेक ठिकाणी मातीचा वापर केला आहे. स्थानिकांच्या भविष्यातील अडचणींचा विचार न करता हे काम सुरु आहे. मात्र, याचा परिणाम भविष्यात मदनवाडीच्या नागरिकांना भोगावे लागणार आहेत. तरी खालील सूचनांचा विचार करून त्यामध्ये तत्काळ बदल करण्यात यावा, अन्यथा काम बंद आंदोलन करून आम्हाला प्रशासनाला जाब विचारावा लागेल असे निवेदनात म्हंटले आहे.
काय आहेत मागण्या?
- मदनवाडी चौकापासून पूर्वीच्या जागी असलेल्या सर्व मोरी पूर्वी होत्या त्या ठिकाणी जशास तसे ठेवण्यात याव्यात
ड्रेनेज लाईन करताना कुठे उंच तर कुठे खाली घेण्यात आले आहेत, यामागे कोणाचा तरी राजकीय दबाव असल्याचे दिसून येत असून त्या सर्वत्र अंदाजपत्रकाप्रमाणे ठेवण्यात याव्यात - मदनवाडी चौक ते बारामती रस्त्याच्या उत्तरेकडे मोठा डोंगर असून पावसाळ्यात डोंगरावरील पाणी रस्त्यावर न येता नजीकच्या
- घरामध्ये घुसून नुकसान होऊ शकते त्यामुळे सर्व मोरी तात्काळ तयार करण्यात याव्यात, अन्यथा हे काम बंद केले जाईल आणि भविष्यात होणाऱ्या जीवितहानीला प्रशासन व ठेकेदार जबाबदार राहतील. असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या रस्त्याच्या कामासाठी नवीन सॉईल स्टेपीलायझेशन ही पद्धत अंमलात आली आहे. या मातीत सिमेंट केमिकल मिक्स करून ती अत्याधुनिक मशनरीच्या सहय्याने दगडा प्रमाणे कडक बनवली जाणार आहे. या नव्या पद्धतीचा वापर करून गावात रस्ता केला जाणार आहे. सध्या तक्रारवाडी गावाजवळ याचा पहिला प्रयोग यशस्वीपणे करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर मदनवाडी येथेही अशा पद्धतीचा वापर करून त्यावर रस्ता बनविला जाणार आहे. या नव्या पद्धतीची तरतूद अंदाजपत्रकात आहे.
मधुकर सुर्वे, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग