प्रदिप रासकर
शिरूर : बँक ऑफ महाराष्ट्रच्या टाकळी हाजी (ता शिरूर) शाखेतील कामकाज गेल्या दोन महिन्यांपासून अनियमित सुरू आहे. बँकेच्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांबरोबरच कर्मचारीही वैतागले आहेत. बँकेतील कामकाज संथगतीने होत असून, ग्राहकांना आवश्यक त्या सेवा मिळत नाहीत. बँकेतील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही. येथील एका कर्मचाऱ्याची बदली झाल्यामुळे रिक्त जागेवर नवीन कर्मचारी न आल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. ग्राहकांना बँकेत तासन् तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत.
मंगळवारी (दि. 22) सर्वरच्या अडचणीमुळे सकाळपासूनच बँकेचे कामकाज सुरू होऊ शकले नाही. बँकेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शाखा व्यवस्थापकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करूनही कामकाज सुरू होऊ न शकल्याने ग्राहकांनी मलठण येथील शाखेत व्यवहार करावेत. असा फलकच बँकेच्या प्रवेशद्वारावर लावला. यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असून येथील सेवा केव्हा सुरू होईल याची खात्री नसल्याचे बोलले जात आहे.
अनेक दिवसांपासून या शाखेमध्ये सर्वरच्या अडचणीमुळे ग्राहकांना योग्य त्या सेवा मिळत नाहीत. यामध्ये धनादेश जमा न होणे, पासबुक प्रिंटर बंद असणे, आणि कामकाजाच्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे केवायसी प्रक्रियेस विलंब लागणे यामुळे ग्राहकांना मनस्ताप सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन महिन्यापासून अनेक ग्राहक बँकेत केवायसी करण्यासाठी वारंवार हेलपाटे घालत आहेत.
या बँकेत खाते असल्याने केवायसी ची अडचण आली त्यामुळे शासनाच्या लाडक्या बहिण योजनेचा फायदा घेता आला नसल्याची तक्रारी महिला करत आहेत. तसेच दीपावली जवळ आली आहे, येथील सर्वर व्यवस्थित सुरू झाले नाही, तर दुसऱ्या बँकेची वाट धरावी लागणार असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.